वॉशिंग्टन – व्हाईट हाऊसकडून काल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची कर्तव्ये पार पाडण्यास पूर्णतः सक्षम असल्याचे नमूद केले आहे. ७८ वर्षीय ट्रम्प यांनी शुक्रवार ११ एप्रिलला मेरीलँडमधील वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर येथे त्यांच्या मेंदूची आणि हृदयाची तपासणी केली. हा अहवाल अध्यक्षांचे वैद्यकीय अधिकारी आणि नौदलाचे कॅप्टन डॉ. सीन पी. बार्बाबेला यांनी तयार केला आहे.
या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आरोग्य तपासणी केली असून त्यात त्यांच्या मेंदू आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत कोणतीही उणीव आढळली नाही. त्यांनी मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट या मानसिक क्षमतेच्या चाचणीत ३० पैकी ३० गुण मिळवले आहेत. त्यांना उच्च कोलेस्टेरॉलसारख्या काही आरोग्यविषयक समस्या आहेत. मात्र त्यावर उपचार सुरू असून ते योग्य प्रकारे नियंत्रणात आहेत. याशिवाय त्यांच्यावर त्वचा समस्या,काही ॲलर्जी आणि मोतीबिंदू संबंधित उपचार झालेले आहेत. ट्रम्प यांनी जानेवारी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद सांभाळल्यानंतरचा हा पहिलाच सार्वजनिक आरोग्य अहवाल आहे. ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत.