Shraddha Kapoor Luxury Apartment: अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी 2024 हे वर्ष खास राहिले. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या स्त्री-2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता वर्ष 2025 ची सुरुवात देखील श्रद्धासाठी चांगली झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने नवीन घर खरेदी केले आहे.
श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) तिच्या वडिलांसोबत, शक्ती कपूर यांच्यासह, मुंबईत एक नवीन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. श्रद्धाच्या या नवीन घराचे रजिस्ट्रेशन 13 जानेवारी 2025 रोजी पूर्ण झाले. मागील काही महिन्यांपासून श्रद्धा भाड्याने घेतलेल्या घरात राहत होती. त्यामुळे आता ती लवकरच या नवीन आलिशान अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होण्याची शक्यता आहे.
घरासाठी खर्च केले कोट्यावधी रुपये
श्रद्धा कपूरचे नवीन अपार्टमेंट मुंबईच्या (Mumbai) जुहू येथील पिरामल महालक्ष्मी साउथ टॉवरमध्ये आहे. हा शहरातील सर्वात उच्चभ्रू भागांपैकी एक आहे. रेसकोर्स आणि सी व्ह्यूमुळे अनेकांकडून या ठिकाणी अपार्टमेंट खरेदीला प्राधान्य दिले जाते.
श्रद्धाचे हे नवीन घर 1042.73 स्क्वेअर फूट एवढे मोठे असून, यामध्ये दोन मोठ्या बाल्कनी आहेत. या अपार्टमेंटसाठी प्रति स्क्वेअर फूट किंमत 59,875 रुपये आहे. श्रद्धाने या घरासाठी तब्बल 6.24 कोटी रुपये मोजले आहेत.
1 वर्षासाठी भाड्याने घेतले होते घर
यापूर्वी तिने एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. 3,928.86 स्क्वेअर फूट असलेले अपार्टमेंटला एका वर्षासाठी लीजवर घेतले होते. यासाठी श्रद्धाने 72 लाख रुपये आधीच दिले होते. म्हणजेच, या घरासाठी महिन्याला जवळपास 6 लाख रुपये भाडे श्रद्धा देत होती.