अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेतील आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
या हल्ल्यात सैफ अली खान (Saif Ali Khan) मान, पाठ, हात आणि डोकं यासह 6 ठिकाणी चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर सैफला रात्री 3 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. तसेच, धोका टळला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) टीमकडून निवेदन जारी करण्यात आले असून, सर्जरीनंतर सैफच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली.
हल्ला करणारी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसली होती. यावेळी घरात काम करणाऱ्या कामगाराशी चोराचा वाद झाला. आराडाओरड ऐकूण सैफ खाली आला व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफवर हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 10 पथके तैनात करण्यात आली असून, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.