Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्यासह 5 जणांविरोधात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊच्या गोंटी नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआआयर दाखल करण्यात आली आहे. एफआयआरनुसार या सात आरोपींनी 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
श्रेयस तळपद, आलोक नाथ आणि क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटीच्या पाच सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, मागील सहा वर्षांपासून या क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटीने लोकांकडून पैसे गोळा केले. मात्र, गुंतवणूकदारांनी पैसे मागताच पळ गाठला. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या सोसायटीच्या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आले आहे. अभिनेता सोनू सूद देखील सोसायटीच्या एका कार्यक्रमात मुख्य पाहुणा म्हणून उपस्थित होता.
काही दिवसांपूर्वीच श्रेयस आणि आलोक नाथ यांच्यासह 11 जणांविरोधात मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळ्याचे आरोप करत हरियाणाच्या सोनीपतमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
एफआयआरनुसार, सप्टेंबर 2016 ला या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये कामकाजाला सुरुवात केली. या संस्थेची नोंदणी मध्य प्रदेशच्या इंदूर येथे करण्यात आलेली आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आवर्ती ठेव आणि मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र, नंतर गुंतवणुकदारांनी पैसे परत मागताच कोणताही प्रतिसाद दिला नाही.