अभिनेता विजयने काढली भव्य राजकीय मिरवणूक

विल्लुपुरम – दाक्षिणात्य अभिनेता विजय यांनी काल आपली पहिली राजकीय मिरवणूक काढली. यावेळी लाखो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा करत आपले पहिले राजकीय भाषण केले. विजय यांच्या मिरवणुकीला व त्याच्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद पाहाता तामिळनाडूत आणखी एका अभिनेता असलेल्या राजकीय नेत्याचा उदय झाल्याची चर्चा आहे.यावेळी झालेल्या भव्य जाहीर सभेत विजय यांनी आपल्या तमिलांगा वेट्री कळघम या पक्षाची ध्येयधोरणे घोषित केली. ते म्हणाले की, आम्ही एकता, सामाजिक न्याय, सर्वधर्मसमभाव आणि तमिळच्या प्रचारासाठी झटणार आहोत. न्यायालयातही तमिळ भाषा सक्तीची व्हावी त्याचप्रमाणे राज्यपाल हे पदच रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी असेल. आमच्या जनतेला पक्षाची ध्येयधोरणे व नेत्यांची ओळख करुन देणे आवश्यक आहे. जन्माने सर्वजण सारखे असून राजकारण हे सिनेक्षेत्र नसून ते अधिक गंभीर आहे.या भागात प्रचंड उष्णता असतांनाही विजय यांच्या पहिल्याच मिरवणुकीला वेल्लुपुरम जिल्ह्यातील विक्रवांदी इथे लाखो समर्थक उपस्थित होते. विजय यांच्या या राजकीय पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात आता कोणते वादळ येते याची उत्सुकता आहे.