सिंधुदुर्ग – राज्यात आज सिंधुदुर्ग, कणकवली, इस्लामपूर, जालना, अकोला, सांगली, सातारा, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे कापणी व मळणी सुरू असलेली रब्बी पिके, उन्हाळी बाजरी आणि आंबा फळबागांना फटका बसला आहे.
सिंधुदुर्गात आज सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. कणकवली तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावांना पावसाने झोडपून काढले. ठिकठिकाणी उभारून ठेवलेली भाताची उडवी भिजून गेली. इस्लामपूर किल्लेमच्छिंद्रगड या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानकच सुरू झालेल्या या पावसाने शहरातील बाजारपेठेत तारांबळ उडवली. काही जणांनी पाऊस येणार म्हणून गहू व शाळू काढून ठेवला होता. ते पावसामुळे भिजला. अकोल्यात अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यात सलग दुसर्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सातारा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. सांगलीतही सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि पावसाचा तडाखा बसला.
