कोल्हापूर – कागल तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. उद्या सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा नाका सुरु होणार आहे.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल सीमा तपासणी नाका विविध कारणांनी वादात सापडला होता. नाक्याच्या बांधकामाची रक्कम न मिळाल्याने पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या माध्यमातून तपासणी नाका सुरू होण्याला स्थगिती आणली होती. प्रशासनाला काल हा तपासणी नाका सुरु करायचा होता. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मात्र, नाका सुरू करण्यासाठी आरटीओ विभागाच्या काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे गरजेचे होते. आरटीओ विभागातील काही अधिकाऱ्यांनी आज दुपारी नाक्याला भेट देऊन, आवश्यक तांत्रिक बाबींच्या पूर्तता केली. त्यामुळे उद्या सकाळी हा तपासणी नाका सुरू होणार आहे. त्यासाठी नाका प्रशासनाने पुन्हा पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनसह महाराष्ट्र लॉरी असोसिएशनने आंदोलन करत नाका सुरू करण्याला विरोध केला होता. नाक्याच्या कामात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तपासणी नाका सुरू होवू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनने कागल पोलीस ठाण्यापासून जिल्हा प्रशासनापर्यंत निवेदने दिली होती. संभाव्य विरोध टाळण्यासाठी विरोधातील लॉरी असोसिएशनच्या आंदोलकांना रविवारी ८ डिसेंबरच्या रात्रीच प्रशासनाने स्थानबद्ध केले होते.