अदानी उभारणार दोन वीज निर्मिती केंद्रे

नवी दिल्ली- वीज वितरण व्यवसायात आघाडी घेत अदानी पॉवर ही कंपनी आता देशात दोन नवीन वीज निर्मिती केंद्रे उभारणार आहे. यासाठी भारत हेवी इलेक्टि्रिकल कंपनीला अर्थात भेल कंपनीकडे अदानी पॉवरने ७ हजार कोटी रुपयांच्या यंत्रसामुग्रीची मागणी नोंदवली आहे. भेलच्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली.
अदानी पॉवरने भेलला दिलेली पहिली ऑर्डर ही रायपूर मध्ये १६०० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी आहे. तर दुसरी ऑर्डर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वीज निर्मिती केंद्रासाठी देण्यात आली आहे. या दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांची उभारणी व आवश्यक यंत्रसामुग्री भेल तयार करणार आहे. हे दोन्ही प्रकल्प उभारणे, कार्यान्वित करणे त्याचबरोबर त्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही भेलवर देण्यात आली असून या प्रकल्पासाठी लागणारी वाफेची इंजिने, स्टिम टर्बाईन आणि जनरेटरची उभारणी व बांधणी भेल करणार आहे. भेलच्या त्रिची व हरिद्वार येथील प्रकल्पांमध्ये या यंत्रसामुग्रीची निर्मिती केली जाणार आहे. देशाच्या वीजनिर्मिती साठीच्या यंत्रसामुग्री निर्माणात भेल ही एकमेव सार्वजनिक कंपनी आहे. त्यांच्या अत्याधुनिक अशा कारखान्यात या यंत्रसामुग्रींची निर्मिती करण्यात येणार आहे. विमानतळ , बंदर यानंतर अदानी वीज निर्मीतीत लक्षणीय गुंतवणूक करून या क्षेत्रावरही आपला कब्जा बळकट करणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top