‘अदानी’वरून तिसऱ्या दिवशीही लोकसभा आणि राज्यसभा स्थगित

नवी दिल्ली- उद्योगपती गौतम अदानीविरोधात २ हजार कोटींची लाच दिल्याचा आरोपावरून अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्यावरुन आज तिसऱ्या दिवशीही विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित झाली.
लोकसभेचे कामकाज सुरु होताच वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या प्रियंका गांधी आणि नांदेडमधून निवडून आलेले रवींद्र चव्हाण यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. हा शपथविधीनंतर लोकसभेच्या वेलमध्ये येऊन विरोधकांनी गौतम अदानी यांच्या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली आणि जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडला. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना म्हटले की, “देशाबाहेरील मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही. प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी तुम्हाला वेळ देईन. राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षात सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही. सभागृहाचे कामकाज नियोजनानुसार होऊ द्यायचे नाही, हे योग्य नाही.”
त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राज्यसभेतही या प्रकरणावरुन विरोधकांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणा दिल्या. त्यावेळी राज्यसभा सभापती जगदीप धनखर यांनी सांगितले की, “सभागृह गोंधळ घालण्याचे ठिकाण नाही. तुमच्या गदारोळामुळे आपली लोकशाही कमकुवत होत आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा.” त्यानंतर जगदीप धनखर यांनी राज्यसभा सभागृहाचे कामकाज साडेअकरा वाजेपर्यंत स्थगित केले. मात्र त्यानंतरही पुन्हा लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ सुरू राहिल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top