नागपूर – शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पवारांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छी दिल्या होत्या. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी गटाचे नेते आणि अदानी यांच्यात बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आज कॉंग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत भूमिका स्पष्ट आहे. त्याबद्दल अधिक बोलण्याची गरज नाही.
वडेट्टीवार म्हणाले की, त्यांची बैठक कशासाठी झाली? हे माहीत नाही. पण शरद पवार यांची गौतम अदानी यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज मला वाटत नाही. दिल्लीत सध्या बैठकांचा जोर वाढला आहे, हे खरे आहे. त्यावरून ‘कुछ तो गडबड है’ असे वाटते. कारण भाजपा नेहमीप्रमाणे फोडाफोडीचे राजकारण करत आहे. दुसऱ्यांची घरे, पक्ष फोडल्याशिवाय भाजपाला चैन पडत नाही. त्यामध्ये त्यांना असुरी आनंद मिळतो. या असुरी आनंदापोटी काही गडबड करण्याचा प्रयत्न ते करू शकतात.
\हिवाळी अधिवेशनाबद्दल वडेट्टीवारांबद्दल म्हणाले की, या अधिवेशनातून फार काही निष्पन्न होणार नाही. फुकट कशाला नागपूरला अधिवेशन घेतले? हा प्रश्न पडतो. लोकांना उगाच त्रास देण्यासाठी हे ४-५ दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. त्यात ना प्रश्नोत्तरे, ना लक्षवेधी… काहीच नाही. विधेयकांवर चर्चा, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. एखाद – दुसरा प्रस्ताव विरोधकांकडून येण्याची शक्यता आहे. पण या अधिवेशनाला फार काही महत्त्व नाही. हे अधिवेशन मुंबईत घेतले असते तर बरे झाले असते.
उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्या एकला चलो भूमिकेबाबत ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या देहबोलीतून त्यांना निराशा आल्याचे जाणवत आहे. या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. जय पराजय होत असतो. खचून जाण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांचा पक्ष व विचारधारा वेगळी आहे. त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्र लढण्यासाठी तयार आहोत, मात्र राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की आम्ही निर्णय घेऊ.