अजित पवारांना महायुतीतून काढा आ. कुल समोर पदाधिकार्‍याची खदखद

पुणे – भाजपाचे पदाधिकारी अजित पवारांविरोधात उघडपणे बोलू लागले असून, भाजपा आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत झालेल्या शिरूर लोकसभा आढावा बैठकीत भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी केली. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले असल्याचे चौधरी यांनी म्हटले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या अजित पवार यांच्या समर्थकांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे सुदर्शन चौधरींविरोधात आंदोलन केले. त्यानंतर चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
सुदर्शन चौधरी म्हणाले की, अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अशी भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. अजित पवारांनी सुभाष बापू, योगेश अण्णांवर अन्याय केला आहे. हे मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. अजित पवार यांच्याकडे आमचे आबासाहेब सोनावणे आणि श्याम गावडे निधी मागायला गेले त्यावेळी अजित पवार म्हणाले की, तुमचा काय संबंध आहे? मी 10 टक्केच निधी देईन. अजित पवारांनी भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. त्यांच्यामुळे पुणे जिल्ह्यातील लोकांचे हाल झाले आहेत. ज्या राष्ट्रवादीचा गेली 10 वर्षे आम्ही विरोध करत आहोत तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी आणून ठेवली आहे. कार्यकर्ते भीतीच्या वातावरणात आहेत. अजित पवारांना कशासाठी सत्तेत घेतले आहे? भाजपाच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून ते तालुका पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात भूमिका व्यक्त केली आहे. अजित पवारांनी पालकमंत्री व्हायचे, त्यांनी बॉस व्हायचे, आदेश द्यायचे, भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचे काम करायचे, आम्हाला अशी सत्ता नको.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांचे समर्थक संतापले. त्यांनी चौधरी यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात घुसून त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला. याशिवाय पुणे येथेही चौधरी यांच्याविरोधात ‘खाली डोके वरती पाय, चौधरींचे करायचे काय,’ अशी घोषणाबाजी करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर चौधरी यांनी, ही माझी वैयक्तीक भावना होती. मी अजित पवारांबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही, असे म्हणून माफी मागितली.
दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवरून आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, महायुतीत तिसरा भिडू आला, हे जनतेला पटले नाही. लोक आमच्या विरोधात का गेले, लोकांच्या मनात राग का निर्माण झाला, याचे कारणच हे आहे. राष्ट्रवादीला तुम्ही का घेतले? त्यामुळे आमचे वाटोळे झाले आहे. आम्ही आतापर्यंत शांत होतो. सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी हे भाजपा आणि संघावर बोलत असतील, तर शांत राहणे बरोबर नाही. संघ आणि भाजपावर बोलण्याइतकी त्यांची लायकी नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top