अजित पवारांचा शिखर बँक खटला चालवणार्‍या न्यायाधीशाचीच बदली!

मुंबई – अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याबाबत गंभीर आरोप असलेला महत्त्वाचा खटला चालविणार्‍या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपप्रत्यारोपांची राळ उठली आहे.
न्या. राहुल रोकडे यांची अचानक बदली होऊन उद्याच ते दिंडोशी न्यायालयात आपला पदभारही स्वीकारणार आहेत. न्या. राहुल रोकडे हे कर्तव्यकठोर न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या न्यायालयात अजित पवार संबंधी शिखर बँक घोटाळ्यासह अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, एकनाथ खडसे आरोपी असलेला भोसरी भूखंड गैरहव्यवहार आणि अन्य अनेक मंत्र्यांचे घोटाळ्यांचे खटले गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. अशात ही बदली झाल्याने राजकीय वातावरण तापले असून हे सर्व खटले रखडवायचे हा यामागे हेतू असल्याची चर्चा आहे. शिखर बँक घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासात काहीच हाती लागले नसल्याचे कारण देत अजित पवार यांना क्लीन चीट दिली होती आणि क्लोजर रिपोर्ट सादर केला .मात्र याला ईडीने विरोध केल्यामुळे अजित पवारांची क्लीन चीट अडकली आहे. न्या. राहुल रोकडे यांनी या प्रकरणी ईडीला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. याप्रकरणी 12 जुलैला राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी होणार होती. आता त्यांची बदली होणार असल्याने हा खटला रखडणार असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल रोकडे यांनी भाजपाचे आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्यामुळे तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, तर कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात न्या. रोकडे यांनी छगन भुजबळ यांना सुनावले होते की तुम्ही अनेक सुनावणीत गैरहजर राहिला आहात. पुढील सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावले जाईल. माजी खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधातील हनुमान चालिसा पठणाचा खटलाही यांच्याच न्यायालयात सुरू होता. हे महत्त्वाचे खटले चालवणारे न्या. रोकडे यांची अचानक दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. त्यांच्या बदलीवर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सत्तेत आल्यावर सर्व चौकशा बंद होतात, पण भाजपाला आता अजित पवार नको झाले आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी पुन्हा सुरू करून त्यांना बाजूला सारायचे षडयंत्र असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top