फ्लोरिडा – मिल्टन हे या शतकातील सर्वात मोठे चक्रीवादळ काल फ्लोरिडाला धडकले. ५ व्या श्रेणातील या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यामुळे ते तिसऱ्या श्रेणीत आले होते. फ्लोरिडाच्या प्रशासनाने केलेल्या तयारीमुळे या चक्रीवादळात जिवीतहानी झाली नाही.
मिल्टन या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी यावेळी २०५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहिले, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाऊस आला. या वादळाचा फटका दाट लोकवस्तीच्या ताम्पा, सेंट पिटसबर्ग, सारासोटा आणि फोर्ट मायर्स या शहरांना बसला. यावेळी समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या तर परिसरातील नद्या नाल्यांना पूर आले. मुसळधार पावसामुळे परिसरातील तलावही ओसंडून वाहू लागले. किनाऱ्यालगतच्या अनेक लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने जिवीतहानी झाली नसली तरी अनेक घरांची पडझड झाली. फ्लोरिडाच्या अनेक भागातील वीजपुरवठाही बंद ठेवण्यात आला होता. या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी या दरम्यान दोनदा हे चक्रीवादळ पाचव्या श्रेणीपर्यंत पोहोचले होते अशी माहिती हवामान विभागाने दिली. हे चक्रीवादळ पुढे अंटलाटिक महासागराच्या दिशेने गेल्यामुळे या महासागरात असलेल्या वाहतूकीलाही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आपला जर्मनीचा दौराही पुढे ढकलला आहे.