अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई – अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी काल बुधवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली.पहिल्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांच्या तुलनेत दुसऱ्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झाली आहे.मात्र, दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गचे प्रवेश पात्रता गुणही नव्वदीपार गेले आहेत.त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची चुरस अधिकच वाढत जाणार आहे.

मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील १ लाख ९३ हजार ७९२ जागांसाठी १ लाख ७५ हजार ८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर,२० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे,१३ हजार ४६९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १० हजार ३८८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे.

दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयात कला शाखेच्या २८ हजार २३८ जागा उपलब्ध असून ६ हजार १२४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तसेच वाणिज्य शाखेच्या १ लाख २ हजार २२ जागा उपलब्ध असून ४३ हजार ३६७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विज्ञान शाखेच्या ६० हजार ७३२ जागा उपलब्ध असून २३ हजार ५३३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी २ हजार ८०० जागा उपलब्ध असून ४१४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top