अंदमान- भारतीय तटरक्षक दलाने समुद्र मार्गे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखणारी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत म्यानमारच्या एका बोटीमधून देशात आणण्यात येणारे साडेपाच हजार किलो प्रतिबंधित अंमली पदार्थ पकडले आहेत. तटरक्षक दलाने ही बोट, कर्मचारी व या बोटीवरील एक सॅटेलाईट फोनही ताब्यात घेतला आहे.
अंदमानच्या समुद्रातील भारतीय हद्दीत बरेन या बेटापासून ८ समुद्री मैलांवर तटरक्षक दलाच्या डॉर्निअर गस्ती विमानाला एका मासेमारी बोट संशयास्पद रित्या फिरत असलेली दिसली. त्यांनी याची माहिती तात्काळ जवळच्या संयुक्त कारवाई दलाला दिली. त्यानंतर श्रीविजयपुरम येथून एक वेगवान गस्ती नौकेद्वारे या बोटीला घेरण्यात आले. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या बोटीवर प्रवेश केला. त्यावेळी ही बोट म्यानमारची असल्याचे आढळून आले. बोटीची तपासणी केली असता या बोटीवर साडेपाच हजार किलो मिथॅमफेटेमाईन या प्रतिबंधीत अंमली पदार्थाचा साठा आढळून आला. मासेमारी बोट असतांनाही या बोटीवर हा साठा आढळल्याने तटरक्षक दलाने या बोटीवरील ६ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कारवाईत बोटीवरील एक सॅटेलाईट फोनही ताब्यात घेण्यात आला. सोई वाई यान टु या नावाची ही मासेमारी बोट नंतर श्री विजय पूरमच्या किनाऱ्यावर आणण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईतील हा विक्रमी वजनाचा अंमली पदार्थांचा साठा आहे.