अंबाबाई देवीच्या मूर्तीची पुरातत्त्व खात्याकडून पाहणी

कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची आज पुरातत्त्व खात्याच्या दोन निवृत्त अधिकारी विलास मांगीराज व आर.एस.त्र्यंबके यांनी पाहणी केली. उद्यादेखील हे अधिकारी मूर्तीची पाहणी करण्यासाठी मंदिरात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्त्व खात्याकडून वज्रलेप व रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम सुरू आहे.

पुरातत्त्व खात्याकडून ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असून मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे, या मागणीसाठी श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी २०२२ मध्ये दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात न्यायालयाने विलास मांगीराज व आर. एस. त्र्यंबके या पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करावी. तिच्या सध्या परिस्थितीबद्दल व संभाव्य उपाययोजनाबद्दल अहवाल सादर करावा, असा आदेश दिला होता. त्यानुसार, आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुरातत्व खात्याचे दोन अधिकारी मंदिरात दाखल झाले. त्यांच्यासोबत याचिकाकर्ते आणि प्रतिवादी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई अंबाबाई मंदिरात होते. या पाहणीचा अहवाल लवकरच कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top