अंधेरीत रस्ता खोदताना गॅसची पाईप लाईन फुटली

मुंबई- अंधेरी पश्चिम येथील बॉणबोन लेन परिसरात ॲक्सिस बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर काँक्रिटीकरणाच्या कामासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता खोदण्याचे काम सुरू असताना आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू होऊन तो हवेमध्ये पसरू लागला. यामुळे परिसरातील नागरिकांना गॅसच्या वासाचा मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेनंतर महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळावर जाऊन बॉणबोन लेन परिसरातील गॅस पुरवठा तात्काळ बंद केला. मात्र याचा फटका सात बंगला-वर्सोवा परिसरातील साडेतीनशे इमारतींना बसला. या साडेतीनशे इमारतीत राहणाऱ्या अंदाजे अडीच हजार कुटुंबांना गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत स्वयंपाक करता आला नाही. त्यांनतर नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराने महानगर गॅस कंपनीकडून रस्ता खोदकामासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचा आरोप केला. महापालिकेच्या रस्ते विभागाने ‘आर. पी. शहा इन्फ्रा’ या बेजबाबदार कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी व झालेल्या नुकसानीची भरपाई कंत्राटदाराकडून वसूल करावी, अशी मागणी केली.