अंतरवालीत रात्री अचानक अशोक चव्हाण-जरांगे भेट

जालना – माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांनी काल अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास झालेल्या या भेटीत मराठा आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी या जरांगेंच्या मागणीवर चर्चा झाल्याचे दोघांनी सांगितले. मात्र, निवडणुकीत मराठा उमेदवार उतरवण्याची रणनीती जरांगेंकडून आखली जात असताना अशोक चव्हाणांनी अचानक अंतरवालीत जाऊन त्यांची भेट घेतल्याने तिची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, जरांगेंनी 24 मार्चला अंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांच्या निर्णायक बैठकीचे आयोजन केले आहे.
अशोक चव्हाण यांनी काल रात्री पोलीस आणि आपल्या गाड्यांचा ताफा अंतरवालीपासून 15 किलोमीटर दूर थांबवला. त्यानंतर एका साध्या कारमधून अंतरवालीत जात चव्हाणांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना नंतर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘मी नांदेडला जात होतो. जाता जाता जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी इथे आलो. निवडणूक आणि जरांगेंची भेट याचा काहीच संबंध नाही. मी या निवडणुकीत उमेदवारदेखील नाही. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात त्यांची भेट घेतली नाही. जरांगेंच्या मागण्यांवर समन्वयाने मार्ग काढला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे. सद्यस्थितीवर मार्ग कसा काढायचा याबाबत चर्चा झाली. हा मराठा समाजाचा विषय चर्चा करून सुटायला हवा.’
या भेटीबाबत जरांगे म्हणाले की, अशोक चव्हाण एक समाज म्हणून भेटायला आले होते. सरकारकडून आले आहेत का, असे मी आधी विचारले. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांना आमचे सगळे विषय सांगितले. सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करू असे सरकारने सांगितले होते. मात्र अद्याप ही अंमलबजावणी झालेली नाही, मराठ्यांवरील गुन्हे मागे घेणार असे सांगितले होते. मात्र आता हे गुन्हे अधिक वाढत आहेत, हैदराबाद गॅझेट घेतो म्हणाले होते, ते का घेतले नाही? याबाबत चर्चा झाली. अशोक चव्हाण एक समाज म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही दोष देणार नाही. आमची फसवणूक झाली आहे, हे आम्ही त्यांना ठासून सांगितले.
24 मार्चला होणार्‍या निर्णायक बैठकीबाबत जरांगे म्हणाले की, 24 मार्चला आम्ही अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व साखळी उपोषणकर्ते, आमरण उपोषणकर्ते, स्वयंसेवक, ज्यांनी सभांचे आयोजन केले होते ते आयोजक आणि नियोजक, रॅलींचे आयोजक आणि नियोजक, मराठा समाजाचे वकील, डॉक्टर, शिक्षक आणि अभ्यासक या सगळ्यांनी 24 मार्चला अंतरवालीला यायचे आहे. ही मराठ्यांची महासभा असेल. यामध्ये पुढची दिशा काय, हे ठरवले जाणार आहे. 24 मार्चला सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. त्यामुळे लांबच्या जिल्ह्यातील मराठा बांधवांनी 23 मार्चला इथे मुक्कामाला यायचे आहे. त्यादिवशी सण आहे, पण आपल्या आरक्षणासाठी सर्व सण बाजूला ठेवा. दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक संपेल.
सभेसाठी मैदानात मंडप टाकला जाणार आहे. या मंडपात मराठा बांधवाच्या राहण्याची सोय केली जाईल. ही आपली निर्णायक बैठक असेल. सरकारने त्यांची दिशा ठरवली आहे. त्यामुळे आता आपल्यालादेखील आपली दिशा ठरवायची आहे. सरकारने आचारसंहिता लावून आमचे वाटोळे केले. त्यांनी त्यांचा डाव टाकला. आता मराठे 24 मार्चनंतर त्यांचा डाव टाकणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top