मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार आहेत. या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी आयोगाला भाडेतत्त्वावर देणार आहेत. त्यातून निवडणूक साहित्याची वाहतूक केली जाणार आहे. मात्र, या बसची मागणी दिवसातील ठराविक कालावधीसाठी असल्याने नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
एसटीच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या १३,३६७ बस असून निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबईसह राज्यातील ३१ विभागांतून ९,२३२ गाड्या उपलब्ध करून देणार आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने बस तैनात करणे हे मोठे आव्हान असले तरी मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.