मुंबई – मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही एक्स्प्रेस एकेरी धावणार आहे. म्हणजेच ही एक्स्प्रेस सीएसएमटीहून मडगावला जाणार आहे मात्र, परतीचा प्रवास ही एक्स्प्रेस करणार नाही. ही विशेष गाडी ९ जून रोजी सीएसएमटी, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणार आहे. ही गाडी सकाळी ५:३० वाजता सुटणार असून मडगाव जंक्शनला त्याच दिवशी संध्याकाळी ५:२० च्या सुमारास वाजता पोहचणार आहे.
सुट्टीच्या कालावधीत अनेकांना रेल्वे आरक्षण मिळाले नाही. अशा प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन ही विशेष गाडी सोडणार आहे. या रेल्वेचे बुकिंग सुरू झाले आहे.
ही विशेष एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीत एकूण १६ कोच असणार आहेत. यामध्ये एक विस्टाडोम कोच आहे. तर, एसी चेअर कार कोच ३, द्वितीय श्रेणी आसन कोच १०, एसएलआर कोच १ आणि जनरेटर कार १ अशी रचना असणार आहे. दरम्यान, ओडिशा अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-मडगाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे उदघाटन रद्द करण्यात आले. त्यामुळे या गाडीचा शुभारंभ आणखी लांबणीवर गेला आहे.