उरण – मागील ८ दिवसांपासून समुद्रातील खराब हवामानामुळे जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहू जहाजांची वाहतूक मंदावली आहे.बंदराच्या प्रवेशद्वारावर कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
पावसाळ्यात समुद्रातील हवामान खराब बनत चालले आहे.त्यामुळे जेएनपीटी बंदरात दाखल होण्यासाठी मालवाहू जहाजांना २५ दिवसांऐवजी ४० दिवस लागत आहेत.त्यानंतर कंटेनर उतरविणे आणि चढविणे यासाठीही अधिक वेळ लागत आहे.खराब हवामानाबरोबर जहाजांमध्ये काही तांत्रिक बिघाडही घडत आहेत.या जहाज वाहतुकीच्या विलंबामुळे नाशवंत मालाचे नुकसान होण्याची मोठी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या निर्यात होणार्या मालाचे हजारो कंटेनर ट्रेलर जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत.त्यामुळे बाहेरून येणार्या कंटेनर ट्रेलरना बंदरात जागाच नाही.या बंदरातून कांदा, फळे,मांस यासारखे पदार्थ रिफर कंटेनरमधून देशाबाहेर पाठविले जात असतात.त्यांना ठराविक वेळेनंतर चार्ज करावे लागते. असे कंटेनर वाहतूककोंडीत अडकल्याने त्यातील मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.