परभणी – सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ८ ते १६ डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजर्या होणार्या यात्रा महोत्सवात दररोज श्रीच्या मूर्तीस लघुरुद्र व पवमान अभिषेक,अखंड हरिनाम सप्ताह,श्री गुरुचरित्र पारायण,हरिपाठ,महिला मंडळाचे भजन,कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नादविहार संगीत परिवार सेलू यांच्या वतीने अखंड विष्णुसहस्रनाम सप्ताह तसेच विवेक वसंत मंडलिक व गोविंद वसंत मंडलिक यांचे शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण तर वेशास सारंग रामचंद्र सराफ व वेशास ओंकार नर्सिकर यांचे ऋग्वेद शाकल संहिता पारायण होणार आहेत. ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या श्रीमद भागवत कथेचे निरूपण ११ ते ४ या वेळेत होणार आहे. दररोज रात्री ९ वाजता हभप बालासाहेब महाराज नेब (समर्थ जांब) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. ११ डिसेंबर रोजी केशवराज बाबासाहेब महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे सकाळी ७ ते ९ या वेळेत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ओवीबद्ध चरित्राचे सामूहिक ३ पाठ होणार आहेत. ९ वाजता श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय पठन व सायंकाळी श्रींची आराधना, अभिषेक व महापूजा होणार आहे.