पंढरपूर- संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता ही समिती बरखास्त करावी आणि समितीतील सदस्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे केली आहे.
अर्जुन जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जुने सदस्य भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ आणि कमी वेळेत देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे ही ७ वर्षे जुनी असलेली समिती बरखास्त करावी. तसेच वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या समितीमध्ये सदस्य संख्या वाढविण्याची तरतूद करावी. जर सदस्य संख्या वाढवली तर येणाऱ्या वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल. सुलभ आणि वेळेत दर्शन होण्यासाठी नियोजन करता येईल. तसेच मंदिर समितीकडे अनेकांनी विविध बाबतीत मागणी केली आहे. यावर अद्यापही विचार केला जात नाही. त्या सर्व बाबींवर विचार करून त्यावर निर्णय घेता येईल. याने अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना या समितीवर नियुक्त करून सेवेची संधी देता येईल.