पुणे- जगातील दुसरी मौल्यवान कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात मोठा जमीनखरेदी करार केला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजवडी येथे ५२० कोटी खर्चून १६ एकर जागा खरेदी केली आहे. देशातील प्रमुख आयटी हबमध्ये पुण्याचा समावेश होतो.
मायक्रोसॉफ्टने भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवली आहे. मायक्रोसॉफ्टचे भारतीय युनिट मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे ही १६.४ एकर जमीन खरेदी केली आहे. हा करार ऑगस्टमध्ये झाला होता. कंपनीने ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीकडून खरेदी केली आहे. या करारावर ३१.१८ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.
कंपनीने २०२२ मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये २५ एकरचा भूखंड ३२८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. मायक्रोसॉफ्ट भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. जमीन खरेदी करणे हा त्याचाच एक भाग आहे. कंपनीने यापूर्वीच पुणे, मुंबई आणि चेन्नई येथे डेटा सेंटर तयार केले आहेत. सध्या कंपनीचे भारतात २३,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कंपनीची बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे येथे कार्यालये आहेत. वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने भारतात एक कौशल्य उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत २०२५ पर्यंत २० लाख लोकांना एआय आणि डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे.