श्रीनगर – दक्षिण काश्मिरमधील बाबा बर्फानी अर्थात अमरनाथ गुहेतील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या भगवान शंकराच्या शिवलिंगाची काल सोमवारी चार लाख भाविकांनी दर्शन घेतले. तसेच आज २,४८४ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूहून काश्मीरला रवाना झाली.आतापर्यत दर्शन घेणार्या एकूण यात्रेकरूंची संख्या ४,०८,५१८ वर पोहचली आहे,अशी माहिती श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकार्यांनी दिली.
श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकार्यांनी सांगितले की,३,८८० मीटर उंच पवित्र गुहा मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या आता ४,०८,५१८ वर पोहचली आहे. सोमवारी पवित्र गुहेला भेट देणाऱ्यांमध्ये ७,७६० पुरुष, २,७७२ महिला, १७५ साधू आणि एका साध्वीचा समावेश आहे.१,६०० हून अधिक सुरक्षा दलांचे जवान आणि १७४ मुलांनीही तीर्थयात्रा केली.यावर्षीच्या यात्रेत दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यात हरियाणातील एक सेवादार आणि झारखंडमधील एका यात्रेकरूचा समावेश आहे. जून महिन्यात बालटाल रोडवर दोघांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ५२ दिवस चालणाऱ्या या यात्रेची १९ ऑगस्टला सांगता होणार आहे.गेल्या वर्षी साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली होती.