जयपूर- राजस्थानातील रणथंबोर (सवाई माधोपूर) अभयारण्यातील सर्वांत घातक असलेला वाघ टी- १०४ ऊर्फ चिकूचा उदयपूरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.चिकूने आतापर्यंत तीन माणसांचे बळी घेतले आहेत.चिकूला जेरबंद केल्यानंतर उदयपूरच्या सज्जनगड बायोलॉजिकल पार्कमध्ये पिंजर्यात देखरेखीखाली ठेवले असताना त्याचा मृत्यू झाला.
या नरभक्षक वाघाला मंगळवारी रात्री आठ वाजता पार्कमध्ये मोकळे सोडले होते. रात्री १० वाजता तो तेथील तलावात जावून बसला होता.तासभर पाण्यात बसून राहिल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो पाण्याबाहेर येऊन एका जागी जावून बसला.पण काहीवेळानंतर निपचित पडलेला दिसला. वनकर्मचार्यांनी त्याला आवाज करून उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. कर्मचारी जवळ गेले तेव्हा तो मृतावस्थेत असल्याचे समजले.
पार्कचे डीएफओ अजय चितोडा यांनी सांगितले की,अतिउष्णतेमुळे चिकू वाघाला वातानुकूलित वाहनातून रणथंबोर येथून उदयपूरला आणले होते. त्याने रात्री तलावातील पाणी प्यायले होते.पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोस्टमार्टेम अहवालानंतरच समजू शकेल.