मुंबई – सलग तीन वर्षे जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या मुंबई शहरातील भायखळा येथील राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शुक्रवार ३१ जानेवारीपासून फुलांचा महोत्सव अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येत आहे.२ फेब्रुवारी पर्यंत हा पुष्पोत्सव लोकांसाठी खुला असणार आहे
यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांनी साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासह मुंबईकरांच्या ज्ञानातही यामुळे भर पडणार आहे. शिवाय आपल्या देशातील राष्ट्रीय प्रतिकांबाबत राष्ट्रभिमानही वाढणार आहे.पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई पुष्पोत्सवाची वैशिष्ट म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पहावयास मिळणार आहेत. त्यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत असतो. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून असतात. आतापर्यंत या पुष्पोत्स्वात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉईंट, डिज्नी लँड, जलजीवन, अॅक्वाटीक वर्ड, अॅनिमल किंगडम आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच धर्तीवर आधारित यंदा भारताची राष्ट्रीय प्रतिके अशी संकल्पना ठरवून पुष्पोत्सवात फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
३१ जानेवारीपासून राणीबागेत भरणार भव्य ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शन
