नवी दिल्ली – बँकांच्या संगणकीय प्रणालीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज देशातील ३०० हून अधिक लहान बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. यामुळे या लहान बँकांचे एटीएम व युपीआय पेमेंट सेवा प्रभावित झाल्या.रनसमवेअर या नावाचा हा सायबर हल्ला होता. या सायबर हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रणालीच बंद पडते. ती पुन्हा सुरु करण्यासाठी हॅकर मोठी रक्कम मागत असतात. अशाच प्रकारचा सायबर हल्ला देशातील सी एज तंत्रज्ञानावर झाल्यामुळे देशातील अनेक स्थानिक लहान बँकांचे व्यवहार ठप्प झाले. लोकांना आपले पैसेही काढता आले नाहीत. यामुळे देशातील ३०० हून अधिक बँका त्याचप्रमाणे १७ जिल्हा सहकारी बँकांचे व्यवहार प्रभावित झाले. ग्राहकांना आरटीजीएस व इतर प्रकारे पैसे ट्रान्स्फर करता आले नाहीत. ज्यांनी आपल्या खात्यात रोख पैशांचा भरणा केला त्यांचे पैसेही खात्यात जमा झाल्याची नोंद झाली नाही. या हल्ल्यानंतर तातडीने हा दोष दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याच्या सुरक्षाविषयक उपायांचाही आढावा घेण्यात आल्याची माहिती बँकांच्या राष्ट्रीय सहकारी संघटनेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
३०० हून अधिक बँकांना सायबर हल्ल्याचा फटका
