मुंबई – अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. गारपीटीमुळे अकोला जिल्ह्यात, पातुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या पावसामुळे काढणीला आलेला कांदा वाहून गेला आहे. तर काढलेला कांदा म्हणजेच कांद्याचे ढिगारे पाण्याखाली गेल्याने पूर्ण कांदा नष्ट झाला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, २ मे पासून राज्यातील पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दर्शवली.
पुढील महिन्यात १ आणि २ तारखेला राज्यात पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली. यामध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस होण्याचा अंदाज सांगण्यात आला. राज्यात ३ मे रोजी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. परंतु ५,६,७ मे रोजी पुन्हा राज्यात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्येही आज एप्रिल महिन्याच्या शेवटाला जून-जुलै महिन्यासारखा पाऊस बरसला. प्रामुख्याने मुंबई शहरातील पश्चिम उपनगरामध्ये या पावसाच्या धारा बसरल्या. अंधेरी,विलेपार्ले, जोगेश्वरी गोरेगाव, वसई-विरार परिसरात २० ते ३० मिनिटे पावसाच्या सरी बरसल्या. जेथे पाऊस नव्हता तेथे मळभ दाटलेले होते.