२६ मार्चपासून मुंबई-पुणे विमानसेवा
तिकीट भाडे २ हजार २२७ रुपये

पुणे – पुणे-मुंबई विमानसेवेचे तब्बल चार वर्षांनंतर उड्डाण होत आहे. एअर इंडिया ही विमानसेवा सुरू करीत असून पुणे विमानतळाच्या समर शेड्यूलमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या २६ मार्चपासून पुण्याहून मुंबईसाठी ही सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला एका तासात पोचणे शक्य होणार आहे. या विमान प्रवासासाठी इकॉनॉमी तिकीट २ हजार २२७ रुपये आणि बिझनेस क्लास तिकीट १८ हजार ४६७ रुपये इतके असणार आहे.
चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये काही कारणांमुळे मुंबई -पुणे विमानसेवा बंद पडली होती.ती अद्याप बंदच आहे. पण आता या शहराला जोडणारी विमानसेवा एअर इंडिया देणार आहे.त्यासाठी ए -३१९ हे विमान वापरले जाणार असल्याचे वेबसाइट माहितीवरून समजते. मुंबईहून दररोज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारे हे विमान पुण्याला १० वाजून ५० मिनिटांनी पोचेल. पुण्यात ३० मिनिटे थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने ११ वाजून २० मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईला १२ वाजून २० मिनिटांनी पोचेल. याचा फ्लाइंग टाइम १ तास असून, यासाठी एटीआर-७२ या विमानाचा वापर केला जाणार आहे.आठवड्यातून सहा दिवस ही विमानसेवा चालणार आहे. या विमानसेवेसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. दरम्यान,१५ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेजने पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, ती सेवा काही कारणांमुळे २०१९ मध्ये बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत केवळ चर्चा झाल्या. प्रत्यक्षात मात्र ही विमानसेवा चार वर्षानंतर सुरू होत आहे.

Scroll to Top