चिपळूण- गेल्या २५ वर्षांत प्रथमच करंबवणे वाशिष्ठी-दाभोळ खाडीत माशांचा बंपर लॉट
लागला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे सापडल्याने खाडीपट्ट्यातील मच्छीमार आनंद व्यक्त करीत आहेत.
समुद्रातील बंद ठेवण्यात आलेले सक्शन पंप,कमी झालेले लोटेतील प्रदूषण आणि नव्या सरकारच्या काळात ठप्प झालेली एलईडी मासेमारी याचा परिणाम म्हणून दाभोळ, वाशिष्ठी खाडीपट्ट्यात मच्छीमारांना बंपर मासळी सापडली आहे. खाडीतील दिवा बेट परिसरात मंगळवारी कोतवली आणि आयनीमधील मासेमारांना १ हजार ७०० किलो मासे मिळाले. यामुळे स्थानिक भोई मासेमार व्यावसायिकांची चंगळ झाली आहे. या खाडीमध्ये दोन ते तीन किलो वजनाचे मासे मिळत असून घाऊक बाजारात त्याची विक्री होत आहे तर स्थानिक बाजारपेठेत ३०० रूपये किलो दराने मासे विकले जात आहेत. एका व्यापार्याने घाऊक खरेदी करून हे मासे मुंबईमध्ये पाठविले आहेत. वाशिष्ठी खाडीमध्ये मांगण, बांण, शिंगटी, अणू, मुशी, खरबा, काही प्रमाणात कोळंबी अशाप्रकारची मासळी सापडत आहे.
२५ वर्षांत प्रथमच दाभोळ खाडीत ‘बंपर’ मासळी !
