नागपूर: विधान परिषदेत प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात गुरुवारी कॉंग्रेसचे पुसद येथील आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची एसीबी (एंटी करप्शन ब्यूरो)ने आठ तास चौकशी केली. आता त्यांनी दिलेली साक्ष आणि इतरांची साक्ष तपासून त्यात फरक आढळल्यास आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.
एसीबीद्वारे आतापर्यंत २५ लाखाच्या लाच प्रकरणात ११ जणांची साक्ष नोंदविली गेली आहे. यामध्ये आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आरोपी खोडे आणि त्याचा सहकारी, दोन आरटीओ अधिकारी आणि रविभवन येथील सहा जणांचा समावेश आहे. दीड महिन्यांपूर्वी रविभवन परिसरात दिलीप वामनराव खोडे याला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहात अटक केली. एसीबीच्या पथकाने न्यायायलात हजर करून त्याची १ एप्रिलपर्यंत एसीबी कोठडी घेतली. कोठडीत असताना खोडेची कसून चौकशी करण्यात आली. याशिवाय तक्रारदार आरटीओचीही पुन्हा चौकशी करण्यात आली.