पालिका ३.५० कोटी खर्च करणार
मुंबई – मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेले भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालया ला नवा साज चढविला जाणार आहे.या पुरातन वास्तूचा मुंबई महापालिका पुन्हा २० वर्षानंतर जीर्णोद्धार करणार असून त्यासाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
भायखळा येथील जिजामाता उद्यानाजवळ असलेली डॉ.भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय ही प्रथम श्रेणीतील पुरातन वास्तू आहे.१०० वर्षांपूर्वी या वास्तूला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखले जात होते.नंतर १९७५ मध्ये मुंबईचे पहिले वैद्यकीय पदवीधर शहराचे पहिले भारतीय शरीफ आणि संयुक्त संग्रहालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या वास्तूला सचिव भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. या वास्तू मालाड दगडी बांधकामात उभारली आहे. या वास्तूचा सर्वकष जीर्णोद्धार २००३-०४ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर २० वर्षात या वास्तुची काही प्रमाणात पडझड झाली आहे.ही इमारत पुन्हा टिकाऊ आणि मजबुत करण्यासाठी विविध कामे केली जाणार आहेत.
या नूतनीकरण कामांमध्ये मंगरूळी कौलांची दुरुस्ती, आरसीसी स्लॅबची गळती प्रतिबंधक दुरुस्ती, छप्पर आणि नक्षीकाम जीर्णोद्धार, दोन्ही बाजूंनी चुन्याचा गिलावा व रंगकाम,वाळवी प्रतिरोधक कामे,लोखंडी फरसबंदी आणि बाहेरील अनेक शिल्पांचे व्यवस्थित लावण्याचे काम केले जाणार आहे. तसेच या वास्तूचा संरचनात्मक अहवाल तयार करण्यासाठी पुरातन सल्लागार मे. विकास दिलावरी यांची नेमणूक केली आहे.