पुणे –
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे. शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील पिकापासून या पीकविमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश अद्याप कृषी विभागाला मिळू शकलेला नाही. त्यामुळे या विमा योजनेच्या लाभासाठी आणखी काही काळ अध्यादेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सरकारने पंतप्रधान पीक विमा या नावाने ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा केवळ एक रुपयांत उतरविता येणार आहे. मात्र या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार, विम्याचा हप्ता कोठे व कधीपासून भरता येणार, नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास, त्या नुकसानीची माहिती किती दिवसात आणि कोणाकडे द्यावी लागणार, विम्याची रक्कम किती मिळणार, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमावली अद्यापही कृषी विभागाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या योजनेचे निकष, पात्रता आणि त्यातून मिळणारे फायदे, याबाबतची माहिती ही अध्यादेश मिळाल्यानंतरच कळू शकणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.