छत्रपती संभाजीनगर- सध्या वातावरणात हवेचा दाब कमी आहे.त्यामुळे गारठाही कमी आहे.मात्र येत्या पंधरवड्यात हवेचा दाब वाढणार आहे.त्यामुळे थंडी वाढणार आहे.तसेच पुढील महिन्यात १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा महिनाभराचा कालावधी हा कडाक्याच्या थंडीचा असणार आहे,असा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे.
जेव्हा उष्ण वारे असतात,हवेचा दाब कमी होतो, तेव्हा थंडीही कमी होते.दाब वाढला की थंडी वाढते,हे कमाल आणि किमान तापमानामुळे घडते.सरासरीच्या वर तापमान राहिले तर हवेचा दाब कमी होतो.वातावरण ढगाळ होते, त्यामुळे थंडी कमी होते आणि पिकांवरही परिणाम होतो.किमान तापमान घसरण्यास सुरवात झाली की थंडी वाढण्यास सुरवात होते. यंदा १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा जास्त थंडीचा कालावधी आहे.हा ठळकपणे नाशिक,धुळे आणि जळगाव तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा काही भाग येथे थंडी जास्त जाणवणार आहे.या भागांत काही वेळेला चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान घसरू शकते.हे तापमान पहाटे ते सकाळी सात-आठ वाजेपर्यंत असते.त्यानंतर तापमान वाढण्यास सुरू होते, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.