१५ एप्रिलपर्यंत अंतिम सत्र परीक्षा संपणार
२ मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागू

सोलापूर – शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतिम सत्र काही दिवसांत संपणार आहे. पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वी संपणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन १ मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक दिले जाणार आहे. त्यामुळे शाळांची उन्हाळी सुट्टी २ मेपासून सुरु होणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या २,७९५ तर, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या १,०६३ शाळा आहेत. या शाळेतील पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास चार लाखांपर्यंत आहे. या सर्वांची अंतिम सत्र परीक्षा सध्या सुरु आहे. खासगी प्राथमिक शाळांनी देखील याचे नियोजन केले आहे. १५ एप्रिलनंतर १ मेपर्यंत शाळा सुरु राहणार आहेत. पण, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे शाळांकडून बंधन घातले जात नाही. यंदा कोरोना काळानंतर पहिल्यांदाच पूर्ण वर्षभर शाळा व्यवस्थित सुरु राहिल्या. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचा शिक्षकांकडून प्रयत्न झाला. मात्र, अजूनही बरेच विद्यार्थी विशेषतः थेट पहिलीतून तिसरीत व तिसरीतून पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच आहे. त्यांच्याकडे उन्हाळा सुट्टीत लक्ष द्यावे लागणार आहे. शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्तीत जिल्ह्याचा टक्का वाढावा, यादृष्टीने स्वच्छेने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

Scroll to Top