मुंबई- जाहिरात फलकांबाबत मुंबई महापालिकेने आखलेल्या धोरणांचे, आकाराबाबत निर्देशांचे पालन रेल्वे प्रशासनाला करावे लागणार आहे असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते.
न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे काल पुन्हा एकदा पालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि पालिका प्रशासनाच्या या बैठकीत महाकाय आकाराच्या होर्डिंगमुळे मुंबईत पुन्हा घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते वेळीच काढून टाका, अशा सूचना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने रेल्वेला दिल्या. त्यामुळे रेल्वे हद्दीतील ४५ पैकी ३८ होर्डिंग्ज काढण्याची कार्यवाही रेल्वेकडून केली जाईल. तसेच या बैठकीत ४० बाय ४० पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज रेल्वने काढून टाकावेत, या मुद्यावर बैठकीत जोर देण्यात आला. पश्चिम रेल्वेमार्गावर ज्या ठिकाणी ४० बाय ४० पेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज आहेत, त्या जाहिरातदारांना अशा होर्डिंगचे आकार लहान करण्यासाठीचे पत्र पाठविण्यात आले आहेत अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून दिली.