यवतमाळ – आज उबाठा नेते उध्दव ठाकरे हे प्रचार सभेसाठी वणी येथे हेलिकॉप्टरने येताच त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि छोट्या बॅगेची तपासणी आयोगाच्या अधिकार्यांनी केली. यामुळे खळबळ माजली. सत्ताधार्यांनी ही तपासणी योग्य ठरवली तर विरोधकांनी यावर जबरदस्त टीका केली.
उद्धव ठाकरे आज उबाठाचे वणी मतदारसंघाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यात आले होते. त्यांची वणी येथे जाहीर सभा होती. या सभेसाठी ते हेलिकॉप्टरने आले . हेलिकॉप्टर उतरताच उद्धव ठाकरे आणि त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांची हेलिकॉप्टर मधील बॅग निवडणूक आयोग अधिकार्यांनी तपासली. यामुळे उध्दव ठाकरे भडकले होते. अधिकारी हेलिकॉप्टर मधील बॅगा तपासत असताना उध्दव ठाकरे यांनी स्वतः त्याचा व्हिडिओ काढला. अधिकार्यांचे ओळखपत्र तपासले. हा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला. हा तपास सुरू असताना त्यांनी तपास अधिकार्यांना विचारले की, आतापर्यंत किती नेत्यांच्या बॅगा तपासल्या आहेत. माझी बॅग चेक करायला हरकत नाही. पण तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का? याआधी किती लोकांच्या बॅगा तपासल्या आहात? अधिकारी म्हणाले की, चार महिन्यात पहिल्यांदा तुमचीच बॅग तपासत आहोत. यानंतर ठाकरेंनी म्हटले की मला पुढच्या वेळी मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडिओ हवा आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाठवा.
यानंतर प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला जास्त भाषणे करण्याची गरज नाही. कारण लोक सांगत आहेत की, तुम्हाला विजय दिला. फक्त 20 तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधू देऊ नका. आता आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी देखील काढली आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर पट्टी असण्याची गरज नाही. तुम्ही डोळसपणे मतदान करा. मी कोणत्याही माणसांना दोष देत नाही, तर मी यंत्रणेला दोष देत आहे. मी येथे प्रचाराला आल्यानंतर 7-8 अधिकार्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना त्याची परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली तर प्रथम त्या अधिकार्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाक्यानाक्यावर अडवतील तिथे – तिथे तपास अधिकार्यांचे खिसे तपासा. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकार्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी माझी बॅग तपासली तशी मोदी – शहांचीही बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. त्यांचीच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांची बॅग तपासण्याची गरज आहे. अधिकार्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या नाही तर त्या तपासण्याचे काम आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करतील. त्यावेळी मात्र पोलीस व निवडणूक आयोगाने मध्ये यायचे नाही. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसा इतरांच्याही बॅगा तपासण्याचा अधिकार आम्हाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिंधेंच्या हेलिकॉप्टरमधून बॅगाच्या बॅगा जात होत्या. तेव्हा या बॅगा कपड्यांच्या असल्याचे सांगितले होते. पण उन्हाळ्याच्या दिवसांत एवढे कपडे कोणी घालते का? यापुढे शिवसेनाच नव्हे तर आमच्या आघाडीचे सर्वच कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील. होऊन जाऊ द्या. तुम्ही आमच्या तपासा, आम्ही तुमच्या तपासतो. मोकळ्या वातावरणात निवडणूक होऊ द्या.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करत आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणा देत आहेत. पण आम्ही ‘बटेंगे भी नहीं और कटेंगे भी नहीं । पर ध्यान रखो हम आपको लुटने भी नहीं देंगे । भाजपाची ‘महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बाटेंगे’ अशी नीती आहे. स्वतः मोदींना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन मते मागावी लागत आहेत. ही आपल्या बाळासाहेबांची पुण्याई व तुम्हा सगळ्यांचे कर्तृत्व आहे. काल नांदेडला होते. तिथे त्यांनी बाळासाहेबांची प्रशंसा केली. आजपर्यंत ते केवळ मी-मी चा नारा देत होते. कारण आता त्यांच्या लक्षात आले आहे की, महाराष्ट्रात मोदींची सडकी, नासकी, कुजकी, गळकी गॅरंटी चालत नाही. इथे मोदींची खोटी गॅरंटी चालत नाही. इथे केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे नाणे चालते. ते पुढे म्हणाले की, अमित शहा एका सभेत म्हणाले की 370 कलम हटविण्याला काँग्रेस विरोध करत होती. त्यासोबत आता उद्धव ठाकरे बसत आहेत, पण ते विसरले की ते कलम हटवताना मी सोबत होतो. त्यानंतर तुम्ही मला ढकलले, त्यानंतर मी तुम्हाला लाथ मारली. काश्मीरच्या बाता मारता, पण शेतकर्यांच्या प्रश्नावर मौन का बाळगता? काश्मीरमधील 370 कलम हटवले पण सोयाबीनला भाव मिळतो का? पिकविमा, नुकसानभरपाई मिळते का? काश्मीरच्या 370 कलमाचा माझ्या शेतकर्यांशी आणि इथल्या रोजगाराशी संबंध नाही.
महायुतीकडून पोलीस बंदोबस्तात
पैशांचे वाटप! संजय राऊतांचा दावा
उद्धव ठाकरे यांची वणी येथे निवडणूक आयोगाने बॅग तपासली यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी दावा केला की, सत्ताधारी पोलिसांच्या गाड्यांचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर पैसे वाटपासाठी करीत आहेत. संजय राऊत म्हणाले की, आम्ही प्रचाराला जात आहोत, दौर्यावर जातो. आमच्या गाड्या तपासणे, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणे सुरू आहे. आतापर्यंत या पथकाने किती तपासण्या केल्या? मोदी-शहा रोज फिरतात, त्यांची तपासणी केली? अजिबात नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांच्या तपासण्या होत नाहीत. त्यांची वाहने आणि हेलिकॉप्टरमधून पैशांचे वाटप पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. तर पोलिसांच्या गाड्यांचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर पैसे वाटपासाठी केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही बॅगेची तपासणी केली. लोकसभा निवडणुकीवेळी आमच्या बॅगा तपासल्या. जर सगळ्यांना सारखा नियम लावणार असाल, तर आमची काही हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या स्टाफला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याच वाहनांची तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले असेल, तर त्याबाबत आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल.