हेलिकॅाप्टर ढगात भरकटले दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले

गडचिरोली – गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. या अपघातातून राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले. हेलिकॅाप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॅाप्टर जमिनीवर उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीतील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचा भूमिपूजन सोहळा अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला नागपूरहून येत असताना अचानक हेलिकॉप्टर ढगात भरकटले होते, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हेलिकॉप्टर ढगात भरकटल्यावर सुरुवातीला मी काळजीत होतो. आजूबाजूला ढग दिसत होते. फडणवीसांना मी बाहेर बघा असे म्हटले, त्यावर काही काळजी करू नका. आतापर्यंत सहा वेळा असा प्रकार माझ्या बाबतीत झाला आहे. या अपघातात मला काहीही झालेले नाही. त्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही, चिंता करू नका असे फडणवीस म्हणाले. उदय सामंतांनी दादा जमीन दिसायला लागली असे म्हटल्यावर जीव भांड्यात पडला असे पवार म्हणाले. यापूर्वी लातूर, गडचिरोली, अलिबाग दौऱ्यावर असताना फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँडिंग करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top