*पुण्यातील तळेगावचा कारखाना विकत घेणार
चेन्नई – जगातील तिसरी आणि भारतातील दुसरी सर्वांत मोठी वाहन कंपनी असलेला ‘हुंदाई’ मोटर ग्रुप आता तामिळनाडू राज्यात तब्बल २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणूकीतून चेन्नई येथील कारखान्यातून कारची नवीन मॉडेल बाजारात आणली जाणार आहेत. या दक्षिण कोरियन कंपनीने पुण्यातील तळेगाव येथील जनरल मोटर्सचा कारखाना खरेदी करण्याचाही निर्णय घेतला आहे.
हुंदाई कंपनीने नवीन २० हजार कोटींच्या गुंतवणूकीसाठी काल गुरुवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशी सामंजस्य करार केला.यावेळी स्टॅलिन यांनी सांगितले की, हुंदाई कंपनीच्या या गुंतवणुकीमुळे सरकारचे २०३० पर्यंतचे अधिकाधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट गतीने पुढे नेण्यास मदत होणार आहे. सरकार राज्यात उद्योगांना पाठींबा देण्याचे धोरण अवलंबणार आहे.
हुंदाई गेल्या काही दिवसांपासून पुण्याही कारखान्यासाठी जागा शोधत होती. अखेर त्यांचा जागेचा शोध संपला असून पुण्यातील तळेगाव परिसरात बंद असलेला जनरल मोटर्सचा कारखाना ही कंपनी विकत घेणार आहे. या कारखाना अधिग्रहणावर मार्चमध्येच या कंपनीने स्वाक्षरी केली आहे.