सिमला- मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात राज्यातील तब्बल ७० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिमल्यातील ३५, मंडीतील १२,कांगडातील ११,कुलूतील ९ तसेच उना, सिरमौर,लाहोल आणि स्पिती जिल्ह्यातील प्रत्येकी एका रस्त्यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील २२ वीज उपकेंद्रातील वीज पुरवठा विस्कळित झाला आहे. हिमाचलच्या हवामान खात्याने यलो ॲलर्ट जारी केला असून उद्या सोमवार दोन सप्टेंबरपर्यंत राज्यातील काही भागात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार,२७ जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाच्या विविध दुर्घटनेत १५१ जणांचा मृत्यू झाला आहे.या पावसामुळे राज्याचे सुमारे १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.काल शनिवारी सायंकाळी सुंदरनगर येथे विक्रमी ४४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.