शिमला – हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीत मृतांची संख्या ५० वर पोहोचली असून सध्या लष्कर, पोलीस, एनडीआरएफ यांच्यासह विविध पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या ढगफुटीचा फटका बागीपूल येथील तीनशे कोटींच्या निर्माणधीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला बसला आहे.समेज भाग, रामपूर, कुलूतील बाघीपूल, मंडीचे पद्दार येथे ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे समेज आणि रामपूर भागाला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पावसाने बागीपूल येथील बांधकामस्थितीत असलेल्या कुरपान खाड पाणीपुरवठा योजनेची मोठी हानी झाली आहे. योजनेसाठी ३१५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.या नैसर्गिक आपत्तीतील पीडित कुटुंबांना तत्काळ प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा हिमाचल सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच भविष्यात आणखी भरपाई दिली जाईल, असेही मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले. मुख्यमंत्री सुक्खू यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून केंद्र सरकारकडून आणखी मदतीची मागणी केली आहे.