शिमला – हिमाचल प्रदेशातील दमराली येथे रात्री उशिरा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. या घटनेत रस्ते आणि मोबाईल टॉवरचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काल रात्री दमराली आणि टकलेचमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे टकलेचच्या वरच्या भागात दमराली येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले. पूर आल्याने नागरिक घराबाहेर पडले. त्यांनी उंच ठिकाणी आश्रय घेतला. वीजपुरवठा खंडित झाल्याने दमराली येथील मोबाईल टॉवर बंद झाला. पूर आल्याने येथील ६ पंचायतींच्या मोबाईल सिग्नलवर परिणाम झाला. ढगफुटीमुळे टकलेच येथील रस्त्याचा सुमारे ३० मीटर भाग खराब झाला, अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शिमलाचे पोलीस अधीक्षक संजीव कुमार गांधी यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमधील तीन जिल्ह्यांमध्ये ३१ जुलै रोजी ढगफुटी होऊन पुर आला होता. कुल्लूच्या निर्मंद, सेंज आणि मलाना, मंडी पधार आणि शिमलाच्या रामपूर उपविभागात पूर आल्याने २३ लोक अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेत आणखी चार मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. रामपूरच्या आसपास सुन्नी धरण आणि सतलज नदीच्या किनारी चार मृतदेह आढळून आले आहेत. जिल्ह्यात अद्याप १४ जण बेपत्ता आहेत.