मुंबई – वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिहीरला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याने त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता कडक कारवाई करू असे सांगणारे सरकार मिहिरला जामीन मिळण्यास विरोध करतेका, याकडे लक्ष लागले आहे.
वरळी येथे मागील रविवारी हिट अँड रनची घटना घडली. यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. या अपघतानंतर फरार झालेल्या मिहीर शहा याला पोलिसांनी तीन दिवसांनी शहापूर येथून अटक केली होती.पोलीस तपासादरम्यान अपघात झाला त्यावेळी मिहीर शहाने मद्यपान केले आहे, असे समोर आले आहे. मिहीर शहा याला पोलिसांनी शिवडी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने मिहीरला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने मिहीरला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
याप्रकरणी कोणाची कितीही ओळख असली तरीही त्यांना सोडणार नाही, कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले होते. आता मिहीर शाहला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याच्या जामीनाबाबत सरकार कोणती भूमिका घेते,याबद्दल उत्सुकता आहे.
हिट अँड रन प्रकरणी मिहीरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
