तेहरान- हिजाब न घालता समाजमाध्यमावर गाणे पोस्ट करणे एका इराणी गायिकेला चांगलेच महागात पडले असून या आरोपाखाली तिला पोलिसांनी अटक केली आहे.
परस्तु अहमदी या २७ वर्षीय गायिकेने आपल्या समाजमाध्यमावर गाणे पोस्ट केले होते. ते जगभरातील १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. गाणे गातांना व पोस्ट करतांना तिने हिजाब न घातल्याच्या आरोपावरुन काल पोलिसांनी तिला तिच्या घरातून अटक केली. सारी या इराण मधील शहरातून तिला अटक करण्यात आली. सारी हे शहर इराणच्या मजानदारान भागात असून ते राजधानी तेहरानपासून २८० किलोमीटर दूर आहे. हे गाणे युट्यूबर चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. हे गाणे सादर करतांना तिने एक बिनबाह्यांचा गाऊन परिधान केला होता. या बरोबरच तिच्या मागे तिला साथ देणाऱ्या चार वादकांवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यातील दोघांना तेहरानमधून अटक करण्यात आली आहे. इराणमध्ये महिलांना हिजाब परिधान न करणे हा मोठा गुन्हा समजला जातो. या आधी २०२२ मध्ये महसा अमीनी हिचा या हिजाब विरोधातील आंदोलनात मृत्यूही झाला होता.