मुंबई – हिंदूवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात आहेत. आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार का? हिंदूवर जर बांगलादेशात खरच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवणारे आता बीसीसीआयशी बोलत का नाहीत? त्यांना प्रश्न का विचारत नाहीत? असे सवाल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज ट्विट करून विचारले. बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या भारत दौर्यावर आहे. बांगलादेशी संघ उद्यापासून भारतात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.
बांगलादेश क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेसाठी रविवार 15 सप्टेंबरला भारतात दाखल झाला आहे. एका बाजुला भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटीची उत्सुकता शिगेला पोहचली असताना दुसर्या बाजूला सोशल मीडियावर या द्विपक्षीय मालिकेबद्दल असंतोषाची लाट उसळल्याचे चित्र आहे. बांगलादेशचा संघ भारत दौर्यावर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह तीन सामन्यांच्या टी-20 मालिकाही खेळणार आहे. 19 सप्टेंबरला चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात भारत-बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पण ही कसोटी रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बांगलादेशात गेल्याच महिन्यात सत्तांतर झाले. आरक्षणावरून देशभर आंदोलन सुरु झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. शेख हसीना यांनी पंतप्रधानपद सोडत भारतात आश्रय घेतला. हसीना यांनी देश सोडल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली. अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर अत्याचार सुरु झाले. त्यांची घरे पेटवून दिल्याच्या घटना घडू लागल्या. या अत्याचाराचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अजूनही हिंदू सुरक्षित नाहीत. बांगलादेशातील हिंदुंसाठी भाजपा आक्रामक झाली . मात्र आता त्याच बांगलादेशशी आपण क्रिकेट कसोटी सामने खेळणार आहोत. बांगलादेशच्या क्रिकेट संघांतील काही क्रिकेटपटूंवर अत्याचाराचे आरोप आहेत. त्यामुळे उद्या सुरू होणारे सामने रद्द करण्याची मागणी होत आहे.
आदित्य ठाकरेंनी त्यांच्या एक्स (आधीचे ट्वीटर) अकाऊंटवरुन या मालिकेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेत. बांगलादेशचा क्रिकेट संघ भारताच्या दौर्यावर आला आहे. मला आता परराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घ्यायचे आहे की, काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरुन सांगितले जात आहे त्याप्रमाणे मागील 2 महिन्यांपासून बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खर्या आहेत का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल आणि हिंदू तसेच अन्य अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचार होत असेल तर भारत सरकारने क्रिकेट बाबत बीसीसीआयसंदर्भात एवढी मवाळ भूमिका घेत या दौर्याला परवानगी कशी काय दिली? हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्या क्रिकेट संघाला पायघड्या का घालत आहे? हिंसाचार होत नसेल तर परराष्ट्र मंत्रालय कडून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये पसरवत असलेल्या हिंदू समाजावर अत्याचाराच्या बातम्या हा भाजपाने भारतात निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना? इथे एकीकडे त्यांचे ट्रोलर बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत भारतीयांमध्ये द्वेष निर्माण करत आहेत तर दुसरीकडे बीसीसीआय त्याच बांगलादेशच्या संघाचा पाहुणचार करत आहे. हिंदूंवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवणारे आता बीसीसीआयशी बोलत का नाहीत? त्यांना प्रश्न का विचारत नाहीत याचे मला आश्चर्य वाटत आहे. कुठे गेले ह्यांचे हिंदुत्व? त्यांचे हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच
असते का?
आदित्य ठाकरे यांनी भारत-बांगलादेश सामन्याबद्दल सवाल उपस्थित केला आहे तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना हिंदू जनजागृती समितीने भारत-बांगलादेश मालिका रद्द करण्याची मागणी केली आहे. हिंदू जनजागृती समितीने भारत-बांगलादेश मालिका रद्द करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय क्रीडा मंत्री आणि बीसीसीआयकडे केली आहे. यासंदर्भात पत्रही लिहिले असून, त्याची प्रत तिघांनाही पाठवण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीने भारत-बांगलादेश मालिका आयोजित करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि हे लाजिरवाणे कृत्य आहे असे म्हटले आहे. जोपर्यंत बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशसोबत क्रिकेट सामने खेळवू नये, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच बांगलादेशी कलाकारांचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम तात्काळ रद्द करावे असेही सांगितले आहे. हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे की, बांगलादेशसोबत मालिका आयोजित करण्याचा निर्णय म्हणजे हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अपमानास्पद प्रकार आहे. बांगलादेशात हिंदूंची घरे जाळली जात आहेत, मंदिरांची तोडफोड केली जात आहे, त्यांच्या जमिनींवर अतिक्रमण केले जात आहे, हिंदू महिलांना बळी बनवले जात आहे, अशा परिस्थितीत त्यांच्याशी क्रिकेट सामना कसा खेळायचा? हे कदापि सहन करता येणार नाही.
हिंदूंवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले कसे चालते?
