नागपूर – विधानसभा निवडणुकीत मतदारांनी हिंदू हितासाठी मतदान करावे, यासाठी राज्यात साधुसंत आणि धर्मगुरू कामाला लागले आहेत. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जोरदार प्रयत्न सुरू केले असून राज्यभरात २५ पेक्षा जास्त ठिकाणी “संत संमेलन” आयोजित करण्यात आले आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी हे संत संमेलन पार पडले असून लवकरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील ही संत संमेलन होणार आहेत.
विहिंपचे महाराष्ट्र आणि गोव्याचे सरचिटणीस गोविंद शेंडे म्हणाले की, ही संमेलने आयोजित करण्यामागील हेतू हिंदू मतदारांना एकत्र आणणे आणि राज्यातील मतदानाची टक्केवारी सुधारणे हा आहे.आम्ही या संमेलनातून कोणत्याही विशिष्ट पक्षाचा प्रचार करणार नाही.परंतु हिंदू मतदारांची विभागणी होणार नाही याकडे लक्ष देणार आहोत. हे संमेलन नागपूर,अकोला,बीड, धाराशिव,लातूर,नांदेड, जळगाव,धुळे,नंदुरबार, परभणी,जालना, संभाजीनगर,सोलापूर, नाशिक,अकोले,पाथर्डी, सिन्नर,पुणे,सातारा,कर्जत, आळंदी,कराड,अहिल्यानगर,पंढरपूर या ठिकाणी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचा फटका महायुतीच्या रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांसारख्या ज्येष्ठ भाजप सदस्यांना बसला होता.हा धोका टाळण्यासाठी आता हिंदू मतदारांना एकत्र आणण्याचा विहिंपचा हा प्रयत्न आहे.