ढाका – पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केल्यापासून देशात अल्पसंख्याक समुदायांवर आणि विशेषतः हिंदुंवर हल्ला झाल्याच्या ८८ घटनांची नोंद झाली आहे,अशी कबुली अखेर बांगलादेशच्या सरकारने दिली. याआधी सरकार हिंदुंवर हल्ले होत असल्याचा सातत्याने इन्कार करत होते.
काल भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बांगलादेशमध्ये हिंदुंवर होत असलेल्या हल्ल्यांबाबर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युनूस यांचे माध्यम सचिव शफिकूल आलम यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. हल्ल्यांच्या या घटनांमध्ये ७० जणांना अटक करण्यात आली आहे,असे आलम यांनी सांगितले.केवळ हिंदू म्हणून नव्हे तर तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्यामुळे काही लोकांवर हल्ले झाले आहेत,असा दावाही आलम यांनी केला.