नवी दिल्ली – अदानी समूहावर गेल्या वर्षी आर्थिक अनियमिततेचा आणि घोटाळा करून शेअरचे भाव वाढवल्याचा आरोप करणार्या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने काल आणखी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी आरोप केला की, भारताचे बाजार नियामक असलेल्या सेबीच्या (सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) विद्यमान प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच या दोघांची अदानी घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहारासाठी व शेअरचे भाव वाढविण्यासाठी वापरलेल्या विदेशातील दोन बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी आहे. गेल्या वर्षी हिंडेनबर्गने अदानी समूहावर आरोप केल्यावर सेबीने त्यांची चौकशी केली होती आणि अदानीने कोणताही घोटाळा केला नाही, अशी क्लीनचिट दिली होती.
हिंडेनबर्गच्या अहवाला-नुसार, माधबी पुरी-बुच यांच्याकडे अगोरा अॅडव्हायजरी प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीच्या 99 टक्के भागभांडवलाची मालकी असून, या कंपनीत त्यांचे पती धवल हे संचालक आहेत. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार 2022 मध्ये कंपनीने सल्लागार म्हणून 1.98 कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. माधबी यांच्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्या म्हणून असलेल्या पगाराच्या 4.4 पट अधिक ही कमाई आहे. या कंपनीत गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. हा पैसा शेअरच्या किमती वाढवण्यासाठी वापरला गेला.
दुसरी कंपनी ही मॉरिशसची ग्लोबल डायनॅमिक अपॉच्युनिस्ट फंड ही असून या फंडमध्ये गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांनी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. हा पैसाही शेअरच्या किमती वाढवण्यासाठी वापरला गेला.हिंडेनबर्गने असा आरोप केला आहे की, माधबी सेबीची पूर्णवेळ सदस्य होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांचे पती धवल यांनी मॉरिशसच्या फंड प्रशासक ट्रायडंट ट्रस्ट यांना ई-मेल पाठवून कळवले की, त्यांची आणि त्यांच्या पत्नीची ग्लोबल डायनॅमिकमध्ये गुंतवणूक आहे. या निधीचे त्यांना एकट्याने व्यवस्थापन करण्याची परवानगी देण्यात यावी. थोडक्यात धवल यांनी पत्नीच्या शेअरची मालकी मिळवली. 2017 मध्ये माधबी सीबीआयच्या पूर्ण वेळ सदस्य बनल्या. त्यावेळी त्यांच्या ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंडचे मूल्य 8,70,000 डॉलर होते.
हिंडेनबर्गने नव्या अहवालात म्हटले आहे की, सेबीला या घोटाळ्याची पूर्ण माहिती होती. मात्र हितसंबंधांमुळे सेबीने अदानीच्या घोटाळा प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. त्याऐवजी सेबीने हिंडेनबर्गलाच नोटीस पाठवली.
बुच दाम्पत्याने हिंडेनबर्गचे सगळे आरोप फेटाळले असून त्यांनी म्हटले आहे की, या अहवालात करण्यात आलेले निराधार दावे आम्ही पूर्णपणे फेटाळून लावतो. यामध्ये तथ्य नाही. आमचे जीवन आणि आर्थिक स्थिती हे खुले पुस्तक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सेबीला सर्व माहिती पुरवत आहे. हिंडनबर्गवर कारवाईचे आदेश दिल्यामुळेच हिंडेनबर्ग चारित्र्यहनन करत आहे.
अदानी समूहानेही म्हटले की हे आरोप खोडसाळ आणि पूर्वग्रहदुषित असून आमचा विदेशातील कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे. आम्ही वेळोवेळी त्यासंबंधीची कागदपत्रे जाहीर केलेली आहे. आमचे कुणाशीही वैयक्तिक किंवा कंपनी म्हणून व्यावसायिक संबंध नाहीत, असा खुलासा केला आहे.
हिंडेनबर्गने जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांशी संबंधित घोटाळ्याचा आरोप केला होता. यानंतर समूहाचे शेअर मूल्य काही लाख कोटी रुपयांनी घसरले. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. मात्र सुप्रीम कोर्टाने सेबीच्या अहवालाच्या आधारे अदानी समूहाला
निर्दोष ठरवल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या भावात पुन्हा झपाट्याने वाढ झाली.