मुंबई – मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरींमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर पुन्हा एकदा कडाडून हल्ला चढवला. हा निकाल म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा कौल असूच शकत नाही, हे सर्वात मोठे कारस्थान आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
शिवसेनेला दगा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड रोष होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत हीच स्थिती होती. शरद पवार यांच्या सभांना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत होता. तर दुसरीकडे शरद पवार यांना दगा देण्याऱ्या अजित पवार यांच्याबद्दल जनतेमध्ये रोष होता. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात तो रोष स्पष्ट दिसून आला होता.सोयाबीनच्या दराबद्दल शेतकऱ्यांचा केंद्र सरकार आणि भाजपावर रोष होता.कष्टकऱ्यांचा रोष होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला होता. हे सर्व मुद्दे बाजुला सारून अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या बाजुने लागलेला हा निकाल जनतेचा कौल आहे असे मी कदापि मानणार नाही,असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी याप्रसंगी बोलताना अदानी समुहाच्या लाचखोरीचा मुद्दाही उपस्थित केला. गौतमी अदानींच्या लाचखोरीचा मुद्दा अमेरिकेने चव्हाट्यावर मांडला. या अदानीच्याच पैशावर महाराष्ट्रातला विजय मोदी-शहांनी विकत घेतला आहे. मोदी,शहा, फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकच आहेत,अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.